( 1 )
चेहर्यावर काळजी दाटली, की कपाळावरच्या रेषा उभ्या होतात, डोळे वाकडे तिकडे होतात,शरीर आखडून धरल्या जातं. आणि त्या काळजीतून सुटका झाली रे झाली, की मग पहावं. सैल चेहरा, हसणं अगदी डोळ्यातून शरीरातून ओसंडत रहातं.
फिरायला गेलो, की रस्त्यावरच्या कडेला मासळ्या घेवून विकायला बसलेल्या त्या बाईकडे माझी नजर हमखास जातेच ; त्याच बरोबर तिच्या समोर मासळ्यांचा ठेवलेला भला मोठा ट्रे… आणि पलिकडे शेजारीच हमखास बसलेली ती मांजर- ट्रेवरच्या मासळ्यांकडे नजर लावून बसलेली. मांजरीचं आणि त्या बाईचं लक्ष ट्रेमधल्या मासळ्यांकडे…त्यांच्या विक्रीकडे.केव्हाही जाताना माझं लक्ष जायचं.कधी गिर्हाईकांची वर्दळ दिसायची, तर कधी माशा वारत बसलेली ती बाई. आणि ते मांजर. लक्ष ठेवून बसलेलं. हे मांजर या बाईनं पाळलेलं नसणार . हे इथलंच असणार . बाई आली, की येवून बसत असणार. उरले सुरलेले मासे फेकले जातात, त्यावर त्या मांजराची गुजराण असणार. असो.
एकदा पाहिलं, तर तिथे गिर्हाईकं नव्हती आणि बाईचा वैतागलेला चेहरा वाटत होता. लक्षात आलं, की बराच वेळ गिर्हाईक नसावं. आणि बाजूला बसलेल्या मांजराकडे लक्ष गेलं, तर का कोण जाणे, त्याच्या चेहर्यावर खुशी दिसली- माझ्याच मनाचे हे खेळ. कल्पना करीत रहाणं. तर मला एक व्यंगचित्रच सुचलं ते पाहून : मासळी विकणारी बाई गिर्हाईक नसल्याने वैतागलेल्या चेहर्याने बसलेली आहे, आणि आता काही आख्या मासळ्या आपल्याला ‘ गडप ‘ करायला मिळणार या खुशीत असलेल्या त्या मांजराचा चेहरा. मग लक्षात आलं, की एका भागातलं हे चित्र नाही. दोन भाग करावेत- पहिल्या भागात गिर्हाईकांच्या वर्दळीमुळे आनंदलेली बाई आणि वैतागलेलं मांजर ; तर दुसर्या भागात गिर्हाईकं नसल्याने वैतागलेली बाई अन खुशीत आलेलं मांजर ! तर ते असो.
या कल्पनेसरशी अशा कल्पना असलेली व्यंगचित्रं आठवू लागलो. सेम्पेचं एक चित्र आठवलं . त्यात , रस्यावर झालेल्या कार्सच्या टकरीमुळे त्यांच्या मालकांचे भांडण चालू आहे. रस्त्याच्या शेजारच्या घरांतून माणसं आली आहेत. कुणी दारातून,कुणी खिडकीतून, कुणी गॅलरीतून ते भांडण पहात उभी आहेत. प्रत्येक ठिकाणी माणसं ही एका बाजूला-एकत्र येवून हा तंटा पहात आहेत. हा अपघात ज्या दुकानासमोर झाला आहे,ते आहे माशांच्या अक्वेरियमचं. … मोठ्ठ्या अशा त्या ऍक्वेरियमधले सगळे मासेसुध्दा एका कोपर्यात येवून पहात आहेत… भांडणाबद्द्ल सार्वत्रीक कुतुहल या चित्रातून सेम्पेने दाखविले आहे…
तर दुसरं दोन भागातलं चित्र पटकन आठवलं, त्याचा पहिला भाग वर दिला आहे. हॉटेल मध्ये गिर्हाईक येवून बसलं आहे. मेनू कार्ड वाचत आहे.त्याच्या मागेच भलं मोठं ऍक्वेरियम ( याला ऍक्वेरियम म्हणायचं का ) आहे, बाजूला मासे पकडायची जाळी ठेवलेली-म्हणजे गिर्हाईकाने माशांची ऑर्डर दिली, कीत्याला ताजे मासे करून सर्व्ह केले जाणार… ऍक्वेरियम मधले मासे पहा – सगळे गोळा झाले आहेत. त्यांच्या चेहर्यावर ताण आलेला आहे.
( 2 )
आणि त्या गिर्हाईकाने ऑर्डर दिलीय ती steak ची ! ते ऎकताच पहा, मासळ्यांचा आनंद अगदी गगनात(पाण्यातच की ! ) मावेना झाला आहे ! त्यांच्या त्या उसळ्या, तो उल्हास मृत्यूच्या दाढेतून सुटल्याचा…
माणसाच्या असो, की प्राणीमात्रांच्या- क्षणभंगूर आयुष्यातले हे आनंदाचे क्षण मात्र असतात चीरतारुण्याचे .
‘रीडर्स डायजेस्ट’च्या Laughter is the best Medicine’
संग्रहातून घेतलेलं हे सुरेख व्यंगचित्र.
Please visit my other blog http://jaanibemanzil.wordpress.com